हॉटेल, पदार्थ, नावे इत्यादी

कॉलेजला जायला लागल्यापासून हॉटेल नावच्या मित्रमैत्रिणींसोबत बसण्याच्या तीर्थक्षेत्रांला जाणे सुरु झाले. पॉकेटमनी जेमतेम पॉकेटमध्ये मावेल एवढाच. त्यात कटिंग चहा नक्की येई. आई नावाचा ग्रह उच्चीचा असेल तर एखादा वडासांबार बसे. टीटी एम एम पध्दत काय असते, ते कॉलेजमध्ये गेल्यावर कळले. सर्वांना तेच परवडे. दर आठवड्याला कुणीतरी खायला घालायचं, हे फार नव्हतं. (आमच्यावेळी असं नव्हतं, च्या चालीवर आधीचे वाक्य म्हणावे.). एखादा जास्त फिरस्ता मुलगा म्हणे, रोज काय तेच तेच हॉटेल. अमक्या तमक्या ठिकाणी जाऊ पुढच्या वेळेस. त्याचे हे बोलणे ऐकून अनुभवाची क्षितिजे हळुहळू रुंदावतायत, असे वाटे. कोणतेही हॉटेल घ्या. पोहे हा ठरलेला पदार्थ असतो. तो फक्त सकाळी दहापर्यंत मिळतो. दहा वाजून पाच मिनिटांनी तो संपलेला असतो. वडा सांबार, दही वडा, डोसा, उत्तप्पा हे साम्राज्य दहानंतर जे सुरु होतं ते संध्याकाळी सात- आठपर्यंत. काही ठिकाणी जेवायच्या वेळेपर्यंतही मिळते. चहा मात्र सातपर्यंत असतो. त्यानंतर मागितला तर स्पेशल मिळेल, असे सांगितले जाते. फक्त थोडा जास्त उकळवून दहा रुपये वाढवून ते पाणी स्पेशल च्या नावाखाली माथी मारले जाते. गरजवंताला अक्कल नसल्याने प्यावे लागते. हैदराबादी, जयपुरी, मख्खनवाला, मिक्स व्हेज यांची चव सारखीच आढळते. अपवाद असतीलही. हाफ बिर्याणी बरेचदा फुलसारखी दिसते. हीच फुल असेल तर खरी फुल कशी असेल ? थाळी प्रकारात दोन भाज्या ठेवण्याचे प्रयोजन काय ? असे प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे हाटीलवाल्यांनाही माहीत नसतात. अख्खा मसूर नावाचा एक पदार्थ अलीकडे दिसू लागलाय. मी एकदा मला भूक कमी असल्यने अर्धा मसूरच द्या, असे सांगण्याच्या बेतात होतो. चपाती, बोर्नव्हिटा हे प्रकार मेनूकार्डची लांबी वाढवायला लिहितात, असा माझा पक्का समज आहे. जे नाहीये ते मेनूकार्डवर लिहून ठेवायची खोड हॉटेलमालकांना असते. चपाती सांगितल्यावर चपाती नाहीये, रोटी आहे, हे ऐकायला मिळते. बोर्नव्हिटाही नसतो. घरूनच बोर्नव्हिटा न्यावा, त्यांना फक्त दूध मागावे, असे कधी कधी वाटून जाते.
वेटर हा प्रकार फार मजेदार. काही वेटर मुकाट ऑर्डर घेऊन निघून जातात. काही वेटर त्या ऐवजी हे घ्या, असा सल्लाही देतात. काही ऑर्डर आणल्यानंतर आपल्या जवळच उभे राहतात. एका हॉटेलमध्ये वेटर जवळच उभा राहिला, तेव्हा काही काम आहे का, इथे का उभे राहिलात असा प्रश्न विचारून पिटाळून लावावे लागले होते. काही वेटर्सना पदार्थांची यादी तोंडपाठ असते. ते इतक्या वेगात बोलतात की, त्यांच्या तोंडाला स्लो मोशन मशीन बसवावे का, असा विचार येतो. पाणी साधे हवे की बिसलरी हा वेटरसमाजाचा आवडता प्रश्न. तो विचारल्याशिवाय दिवस साजरा होत नाही. काही ठिकाणी मेनू कार्ड दिले जातच नाही. जवळ येऊन फक्त भुवईने विचारले जाते, काय हवंय. जणू ग्राहकाला तिथली यादी पाठ आहे.
आपल्या हॉटेलचे नाव काय ठेवायचे, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. कल्पना, अल्पना, वैशाली, विजय, विठ्ठल कृपा, माऊली कृपा ही नावे मला मोठ्या प्रमाणात दिसली. न्यू हा शब्दही बरेचदा दिसतो. हॉटेलला पन्नास वर्षे झाली तरी न्यू कायम. पूर्वीच्या चित्रपटांत अनेकदा हिंदू हॉटेल असे लिहिलेली पाटी दिसते. सध्या हॉटेलांवर अशी पाटी दिसत नाही. असा उल्लेख करण्याची पध्दत कधीपासून सुरु झाली व का, याबाबत उत्सुकता आहे.
इति हॉटेलललित.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *