मेथांबा

“डाॅन एल पावो रेआलसाठी काम करणार का?”

“मी? काहीतरी काय? मी साधा माणूस आहे हो. डाॅन लोकांशी माझा काय संबंध?”

“मी काय एल पासोवरून आलेला वाटलो काय? तुमच्या बॅगेतली बरणी बघितलीय मी!”

“मग? घरून येताना खाऊ आणलाय फक्त!”

“ती हिरव्या झाकणाची बरणी पाहिली मी. आणि मेथांबा असा स्टिकरसुद्धा!”

“अहो मेथीचे दाणे आणि कैरी यांचं लोणचं असतं ते. त्यात डाॅन एल पावो रेआलला काय स्वारस्य असणार?”

“खामोष! माझे आजोबा नूमवित होते. संधी-समास मीसुद्धा कोळून प्यायलोय.”

“अहो काय बोलताय तुम्ही?”

“मेथी अधिक आंबा यांचा संधी मेथ्यांबा होईल.”

“क्काय?”

“होच मुळी! आणि मेथांबा म्हणजे मेथ अधिक आंबा. मेथाम्फेटमिनची तस्करी करायचा उत्तम मार्ग शोधलात तुम्ही!”

“क्काय?”

“उगाच श्रेयाव्हेर करू नका. चला आता, डाॅन एल पावो रेआल वाट पाहताहेत तुमची!”


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *