हार्ट शेप्ड तिळाच्या वड्या

सोसायटीमधल्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असं काल आम्ही सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरवलं. एक तर व्हॅलेंटाईन हा तमाशा आपला नाही. ती परक्यांची थेरे. आपली प्रभुरामाची भूमी. सीतामाईने नाही म्हंटले प्रभूंना ‘व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करूया.’ इथे या असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. समाजाचे पावित्र्य आपणच जपायला हवे. आपल्या परीने आपण समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, हाच आमचा विचार. पाचव्या मजल्यावरील ठाकरे सेक्रेटरी आहेत. त्यांना म्हंटलं, सरळ एक पत्रक छापूया. आणि डकवूया लिफ्ट जवळ. वाटलं तर लिफ्ट मध्ये, एवढंच काय प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊया. मी स्वतः डीटीपीवाल्या कडून छापून आणायला तयार आहे. ‘ कोण वाचणार ?’ असं त्यांचं म्हणणं. मी म्हटलं, ‘हल्लीची मुलं पत्रक नाही वाचणार पण तेच व्हॉट्सअँप मेसेज म्हणून आलं तर काय चॉईस आहे का साल्यांसमोर ? दिवसरात्र थोबाड मोबाईल मध्येच असतं यांचं.’

मीच एक मेसेज बनवून ग्रुप वर पाठवावा असं सर्वानुमते ठरलं. मला कल्पना होतीच की हे काम मलाच करावे लागणार. शेवटी कुणाला तरी अंधारातील ज्योत व्हावेच लागते.

मी सरळ एक पत्रक.. सॉरी मेसेज बनवला.

तरुणमित्रांनो, या वॅलेंटाईन्स डे ला पुढील गोष्टी आचरणात आणा आणि एक जबाबदार आणि प्रगल्भ नागरिक होण्याचे पुण्यकर्म करा.

१. आय लव यू म्हणू नका. प्रत्येक आय लव यू ची जागा जय श्रीरामाने घेतली पाहिजे.

२. प्रेयसी अथवा प्रियकराला चॉकलेट देणे बंद करा. चॉकलेट ही आपली संस्कृती नाही. प्रेम व्यक्त करायला ना नाही आमची. चॉकलेट ऐवजी तिळाची वडी अथवा लाडू द्यावा. तिळात स्नेह आहे. आत्ताच संक्रांत होऊन गेली आहे त्यामुळे तिळवड्या सापडण्यास कष्ट पडणार नाहीत.

३. व्हॅलेंटाईन डे च्या पार्ट्या बंद झाल्या पाहिजेत. तुम्हाला दिवस साजरा करायचाय ना? मग त्याऐवजी स्नेहसंमेलन घडवून आणा. यावर्षी उशीर झाला असला तरी पुढच्या वर्षी दिवाळीपासूनच तयारीला लागा.

४. दारू पिऊन सेलिब्रेट करणे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. तरुणवर्गाने कोकम सरबताचा पर्याय लक्षात घ्यावा. (कोकम सरबत लाल असते. मला स्वतःचा अभिमान आणि कौतुक वाटले !)

५. गुलाबांबद्दल आमचे काही म्हणणे नाही. ते चालू द्या तुमचे. आम्ही, म्हंणजे आमची पिढी कायमच ओपन माईंडेड राहिली आहे, हे मी इथे नमूद करू इच्छितो.

६. मुद्दा ३ मधल्या स्नेहसंमेलनाची जबाबदारी घेण्यासाठी तरुणवर्गाने पुढे यावे. या वेळी गाण्याच्या भेंड्या खेळण्यास आमची ना नाही. आम्ही सगळ्याच नवीन गोष्टींचा तिरस्कार करणाऱ्यातले नाही. उलट आम्ही प्रोत्साहनच देऊ.

७. विसविशीत आणि जाडजूड टेडी बिअर देऊन प्रेयसीची दिशाभूल करू नका. फिट अँड फाईन असणे हीच काळाची गरज आहे. या रविवारपासून सकाळी ५.३० वाजता मी स्वतः गच्चीवर योगासने शिकवण्यास सुरुवात करीत आहे. या बहुमोल संधीचा फायदा घ्या. उदंड प्रतिसाद अपेक्षित. प्रवेश मूल्य रुपये ५३० फक्त. ( टेडी बिअरच्या किमतीपेक्षा खूपच कमी!)

हा मेसेज मी ग्रुपवरच्या सर्वांना पाठवला. आमच्या हिच्या म्हणण्यानुसार या तरुण मुलांचा वेगळा ग्रुप आहे. हिला बऱ्या माहित असतात असल्या गोष्टी. मला इतका वेळच नसतो.

१४ फेब्रुवारीच्या सकाळी गजाननाने सकाळीच सुनेला ओठांवर चुंबन दिलेले बघितले. म्हणजे मी बघत नव्हतो. दारे उघडी ठेऊन करायचे कशाला असले धंदे? ही म्हणते ते दोघे रोजच घरातून निघतांना असंच करतात. ही कसली आली आहे निरोपाची पद्धत .. नात सकाळीच बाहेर पडली . रात्री उशीर होईल म्हणाली. ती अजून सोसायटीच्या वॉट्सअप ग्रुप वर नाही… माझ्या मताचा ती अनादर करणार नाही.

पुढच्या १४ फेब्रुवारीला सोसायटी मध्ये कोकम सरबताच्या बाटल्या आणि तिळवड्या यांचा स्टॉल लावता येतो का ते बघतो. उद्याच ठाकरेंशी बोलतो.

तिळवड्या हार्ट शेप मध्ये करता येतील का?.. हिला विचारायला हवं.

नरेंद्र बरवे


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *