पाकिस्तान-२

शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं?
हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या ‘माईनकाम्फ’ मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय.
शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता. जर दोन धर्म गेल्या अनेक शतकांमध्ये एकत्र राहण्यासाठी कधीही योग्य नव्हते, तर मग फाळणी आधीच झाली असती. असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की पूर्वी मुघल राजवट होती, त्यामुळे अल्पसंख्याक असूनही मुस्लिमांना वेगळ्या देशाची गरज नव्हती.
पण, हा युक्तिवाद भारतापुरता मर्यादित ठेवून चालनार नाही. जगात काय चालले होते? प्रत्येकजण अचानक स्वतःची हक्काची का शोधू लागला होता?
पहिल्या महायुद्धानंतर, साम्यवाद आणि नाझीवाद दोन्ही उदयास आले. दोन्ही कल्पना भारतात आल्या आणि दोन्हींचा भारतावर प्रभाव पडला.
हिटलरची नवी उंची गाठत असताना 1930 पासून ‘टू नेशन थिअरी’ उघडपणे समोर येऊ लागली.जगभर ‘पितृभूमी’ (फादरलॅंड) आणि ‘शुद्ध वंश’ असे शब्द जिभेवर येऊ लागले. ‘पाकिस्तान’ या शब्दाचे निर्माते चौधरी रहमत अली यांच्यावर नाझीवादाचा इतका प्रभाव होता की त्यांनी हिटलरची अनेक वाक्ये तोंडपाठ केली होती. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाला त्याच वर्षी त्याने शुध्द मुस्लीम देश पाकिस्तान असे पत्रकं वाटायला सुरुवात केली होती.
आपल्या वंशांची, आपल्या धर्मांची, आपल्या हजारो वर्षांच्या पूर्वजांची भूमी शोधून लोक एकत्र करणे, हिंदुत्व या शब्दाद्वारे हिंदूंना एकत्र करणे, मुस्लिम लीगच्या माध्यमातून मुस्लिमांना एकत्र करणे, ज्यूंचा झिओनिझम. युरोपमधील विविध ख्रिश्चन गटांचे जर्मन, पोल, रोमनी, फ्रेंच इ. देशात विभागले जाणे, इतर वंशीयांना देशातून बाहेर काढणे, सर्व काही एकाच वेळी सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धाने शिखर गाठले. केवळ युरोपातच नाही, तर भारतासारख्या देशातही.
रहमत अली हा तरुण रक्ताचा होता, त्याच्यावर हिटलरचा प्रभाव पडला, यात काहीही आश्चर्य नाही. त्यावेळी जर्मनी आणि हिटलरच उगवता सूर्य होता. मोहम्मद अली जिना यांच्या विचारांमध्ये तफावत आहे. एकीकडे इस्लाम देशाची इच्छा आहे, तर दुसरीकडे इंग्रज गेल्यानंतर मुस्लिमांचे काय होईल, अशी भीतीही आहे. जशी युरोपातील ज्यूंची परिस्थिती झाली होती तशीच भारतात मुस्लिमांची होईल का? ज्यूंना त्यांची जमीन शोधली, पण भारतीय मुस्लिम कुठे जाणार? त्यांची जन्मभूमी कुठे आहे? ते पिढ्यानपिढ्या भारतीय आहेत.
भीतीने झाले की बळजबरी झाले. युद्धाने झाले की कूटनीतीने घडले. अवघ्या दोन दशकांत असे कापून-छाटून, वंश-धर्मावर आधारित दोन देश निर्माण झाले. युद्धानंतर पश्चिम आशियाच्या एका सीमेवर ज्यूंचा देश इस्रायल आणि दुसऱ्या सीमेवर मुस्लिमांचा देश पाकिस्तान बनला.
काही देश असे राहीले ज्यात नाझीवादाचे भूत कुठेतरी कोपऱ्यात लपून राहिले. जिथे लोकशाही प्रबळ राहीली. खेदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान त्यातला एक नव्हता, ज्याची किंमत त्याला पुन्हा पुन्हा चुकवावी लागली. लियाकत अली खानना ज्या बागेत गोळ्या घातल्या गेल्या त्या कंपनी बागेचे नाव लियाकत बाग ठेवले गेले. योगायोगाने पाच दशकांनंतर बेनझीर भुट्टो यांचीही याच बागेत हत्या झाली. लियाकत अली खान यांना एका अफगाण व्यक्तीने गोळ्या घातल्या, जो पाकिस्तानमध्ये राजकीय निर्वासित होता. तो सरकारी खर्चाने अबोटाबादमध्ये त्याच भागात राहत होता, ज्या भागात लादेनला काही वर्षांनंतर आश्रय देण्यात आला.
त्याला पकडन्या पुर्वीच त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुख्य पोलिस अधिकाऱ्याच्या विमानाचा अपघात झाला (किंवा केला गेला.) असा अंदाज वर्तवला जातो की अमेरीका-सोव्हिएत शीतयुद्धातील पहिली गोळी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत खान यांना लागली, ही हत्या हा एक आंतरराष्ट्रीय कट होता, ज्यामध्ये ब्रिटिशांचाही सहभाग होता ज्यांची पाकिस्तानवरील प्रशासकीय पकड संपलेली नव्हती. मात्र, स्कॉटलंड यार्डच्या टीमला पाचारण करून तपास केला असता, कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.
एकीकडे लियाकत अली खान यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्याकडे वीस अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मागितली होती, तर दुसरीकडे त्यांना सोव्हिएत युनियनला भेट देण्याची घाई झाली होती. त्यांची हत्या हा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला, त्यानंतर सोव्हिएत हा पर्याय संपला. पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेच्या तावडीत आला. हळूहळू स्वतःच्या सैन्याच्या तावडीत.
(क्रमशः)
मूळ लेखक – प्रविण झा.
पुस्तक – दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.

Dastan E Pakistan


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *