पाकिस्तान-३

पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. बाकीच्या अधिकार्यांचे मत बदलण्याआधीच ‘ऑपरेशन पाकिस्तान’ अंतर्गत ब्रिटिश विमाने दिल्लीला पाठवण्यात आली नी त्यांना ऊचलन्यात आले.
ब्रिटीश भारतातील सुमारे पंधरा हजार कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या वाट्याला एक हजार कारखाने आले, परंतु त्यातील अनेकांचे मालक हिंदू किंवा शीख होते. नव्या पाकिस्तानच्या हातात रोख रक्कमही नव्हती. भारताकडून वाटणी नंतर येणारा पैसा काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी वापरला जाऊ नये म्हणून काही काळ रोखून धरण्यात आला होता. पाकिस्तानची जी काही आर्थिक ताकद होती ती पूर्व पाकिस्तानात होती. तेथे ताग उद्योग होते. त्यांची प्रक्रिया करणारे कारखानेही भारतात गेले, परंतु पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानला आर्थीक बाबतीत बऱ्याच प्रमाणात सांभाळले.
या बंगालींनी पाकिस्तानला नक्कीच सांभाळले, पण त्यांचाही जीव आतून गुदमरायला लागला होता, ते पाकिस्तानच्या लोकसंख्येत निम्म्याहून अधिक होते, पण सिंहासन कराचीत होते. त्यांच्यात आणि पश्चिम पाकिस्तानमधला एकमेव बंध होता तो धर्माचा. हा धागा भक्कम होता, पण भाषेच्या बाबतीत तो तूटला. मोहम्मद अली जिना यांचा असा विश्वास होता की संपूर्ण देश एकत्र करण्यासाठी एक भाषा आवश्यक आहे, ती उर्दू असावी. स्वातंत्र्यानंतर ते एकदाच ढाक्याला गेले होते, आणि फक्त ऊर्दू हीच भाषा असेल असे सांगून परत आले.
बंगालात बंगाली चालेल, उर्दू नाही, या मुद्द्यावर बंगाली ठाम होते. खरे तर जिना किंवा लियाकत अली खान हे दोघेही पाकिस्तान क्षेत्रातले नव्हते. तिथली भाषा आणि संस्कृती त्यांना तितकीच अनोळखी होती जितकी ती बिहार-उत्तर प्रदेशातून आलेल्या मुस्लिमांना होती. ते पंजाबी, बंगाली किंवा सिंधी कसे बोलू शकनार होते? गुजरातचे असूनही ते गुजराती बोलण्यात गडबड करायचे. त्यांचे शिक्षण इंग्रजीत झाले होते आणि ते उर्दूही इंग्रजी शैलीत बोलत. त्यांचे एक भाषण तीस वर्षे पाकिस्तानात दररोज प्रसारित केले जायचे, ज्यात ते म्हणत,“तुम्ही सर्वजण आपापल्या मंदिरात जाण्यासाठी मोकळे आहात. तुम्ही सर्वजण आपापल्या मशिदीत जाण्यास मोकळे आहात. तुम्ही सर्व कोणत्याही प्रार्थनास्थळी जाण्यास मोकळे आहात.”
(1977 मध्ये कोणीतरी हे भाषण गायब केले आणि प्रसारण बंद झाले. आता ते YouTube वर उपलब्ध आहे.)
जिना यांच्या मृत्यूनंतर आणि लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानला हाताळण्यास सक्षम कोणीही उरले नाही. बंगाली ख्वाजा निजामुद्दीन यांना पुढील पंतप्रधान बनवण्यात आले. आता आपली मागणी मान्य होईल असे बंगालींना वाटले. पण त्यांनीही बंगालमध्ये जाऊन उर्दू हीच भाषा राहणार असल्याचे सांगितले. पंजाबी, सिंधी, बलोच, काश्मिरी, पख्तुन कसे तरी उर्दूला तयार (?) झाले, पण बंगालसाठी हा मुद्दा पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची ठिणगी ठरला. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी शेख मुजीब-उर-रहमान या विद्यार्थ्याला तुरुंगात पाठवण्यात आले. 21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाक्यातील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात आठ विद्यार्थी हुतात्मा झाल्याने बंगाल पेटला. पंतप्रधान निजामुद्दीन यांना हटवून आणखी एक बंगाली मोहम्मद अली बोगरा यांना पंतप्रधान करण्यात आले. परिस्थिती पाहून त्यांनी लष्करप्रमुख अयुब खान यांना संरक्षणमंत्री केले. अशाप्रकारे तेथील राजकारणात रेड कार्पेट अंथरून पाकिस्तानी लष्कराचे स्वागत करण्यात आले.
अमेरिकेलाही तेच हवे होते.
(क्रमशः)
मूळ लेखक – प्रविण झा.
पुस्तक – दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.

Dastan E Pakistan


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *