पाकिस्तान-६

“जेव्हा काठीचा मार पडला तेव्हाच देश योग्य मार्गावर आला.” – पाकिस्तानातील एक वयस्क.

पाकिस्तानने पहिल्या दशकात सात पंतप्रधान पाहिले. लियाकत अली खान वगळता उर्वरित दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकले. कोणत्याही राष्ट्रीय निवडणुका झाल्या नाहीत. प्रांतिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तानला आपले स्वातंत्र्य हवे होते. पूर्व पाकिस्तानही हातातून निसटणार होता. निरक्षरता आणि गरिबी वाढत होती. अहमदिया पंथाचे मूलतत्त्ववादी सुन्नी मुस्लिमांशी भिडत होते.

अमेरिकेने अय्युब खान यांना सत्ता हातात घ्यावी लागेल, अन्यथा डॉलर्स मिळणार नाहीत, असा इशारा दिला.
अय्युब खान
.
7 ऑक्टोबर 1958 रोजी राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ जाहीर केला आणि अयुब खान यांच्याकडे सत्ता सोपवली. मात्र 24 ऑक्टोबर रोजी तो मागे घेतला. 27 ऑक्टोबर रोजी अयुब खान यांनी राष्ट्रपतींनाच अटक केली. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान असलेले आणि पाकिस्तानच्या संस्थापकांपैकी एक सुहरावर्दी यांना तुरुंगात टाकण्यात आले. मग हुकूमशाही सुरू झाली, जी कमी-अधिक प्रमाणात पुढच्या दशकभर टिकली. प्रेस सेन्सॉर झाली. लष्कराने “रेडिओ पाकिस्तान” ताब्यात घेतला. विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकले गेले.
.
मात्र, मार्शल लॉने भरकटलेल्या पाकिस्तानलाही एक दिशाही दिली. अयुब खान आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “भ्रष्ट राजकारण्यांच्या हाती देश सोपवून देशही भ्रष्ट होत होता… मार्शल लॉ लागू होताच 170 कोटी रुपयांचा कर जमा झाला. मी एका व्यावसायिकाला विचारले की त्याने त्याचे खरे उत्पन्न का सांगितले? तो म्हणाला की, भिंतींवर लावलेले तुझे ते छायाचित्र ज्यात तू आमच्याकडे बोट दाखवतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर गुरगुरनारे भाव आहेत, ते पाहिले तर आम्हाला भीती वाटायची की हा माणूस माफ करणार नाही.
तीन हजार भ्रष्ट आणी हलगर्जी अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ‘जलद न्यायालये’ निर्माण करण्यात आली. त्यांच्या राजवटीत एका व्यक्तीला जास्तीत जास्त पाचशे एकर सुपीक जमीन ठेवण्याची परवानगी होती. उर्वरित जमीन हिसकावून भूमिहीनांना वाटण्यात आली.
अमेरिकेच्या सांगण्यावरून त्यांनी एक नवीन स्वच्छ राजधानी बनवली, ज्याला ‘इस्लाम’ च्या नावावरून इस्लामाबाद नाव देण्यात आले. हे शहर लष्करी तळ रावळपिंडीजवळ होते, त्यामुळे लष्करावर नियंत्रण ठेवणेही सोपे होते. दुसरे कारण असे की, कराची यूपी-बिहारमधून आलेल्या काही चांगल्या सुशिक्षित मुस्लिमांनी भरले होते, ज्यांच्या चालिरीती त्यांना आवडत नव्हत्या.
अयुब खान यांनीही उलेमांना (धार्मिक नेत्यांना) कमी महत्त्व दिले. त्यांच्या आत्मचरित्रात ते पाकिस्तानला कट्टर आणि विक्षिप्त बनवण्यास ऊलेमा जबाबदार असल्याचे लिहितात. त्यांनी पहिल्या पत्नीच्या परवानगीशिवाय दुसरी पत्नी करण्यास बंदी घातली, मुलांच्या जन्मावर बंधने घातली आणि स्त्रियांना बुरख्यातून बाहेर येण्यास सांगितले.
ते म्हणाले, “विसाव्या शतकातील मुस्लिमाने जुन्या संस्कारातून स्वत:ला खरा मुस्लिम सिद्ध करू नये. आपल्याला आजच्या जगाच्या नियमांनुसार जगायला हवं.”
केनेडी
.
हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्यांनी ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’चे ‘रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ असे नामकरण केले. मात्र, 1962 मध्ये त्यांना पुन्हा ‘इस्लामिक’ लावावे लागले.
एवढे सगळे होऊनही पाकिस्तानची प्रगती मंदावली होती. जनतेच्या विश्वासाला तडा जात होता. जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, ज्यांचा कल भारताकडे होता. अयुब खान यांनी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी निवडणुका जाहीर केल्या. मृत लोकशाहीत निवडणुका ही केवळ औपचारिकता असते.
.
काहीसं जेपींच्या शैलीत, एक नेता तिच्या दीर्घ राजकीय निवृत्तीतून परतली; आणि अयुब खानच्या हुकूमशाही विरोधात उभी राहिली. ही लढाई अयुब खानसाठी अवघड होती. हे ते नाव होतं जे पाकिस्तानचं अस्तित्व होतं. अयुब खान यांच्यासमोर होती कायद-ए-आझम यांची बहीण आणि पाकिस्तानची ‘मदर-ए-मिल्लत’ (राष्ट्रमाता) फातिमा जिन्ना! (क्रमशः)
मूळ लेखक – प्रविण झा.
पुस्तक – दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.

Dastan E Pakistan


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *